महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष श्री. समीर काझी यांच्याकडून मंडळाच्या कामकाजाचा आढावा
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष श्री. समीर काझी यांच्याकडून मंडळाच्या कामकाजाचा आढावा छत्रपती संभाजीनगर दि.14(विमाका): महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष श्री. समीर काझी यांनी आज नवीन वक्फ अधीनियम, वक्फ बाबत महसूल विभागाचे शासन निर्णय, वक्फ जमीनीचे भूसंपादन, वक्फ जमीनीवरील अतिक्रमण तसेच वक्फ जमीनीच्या खालसा याबाबत आढावा घेतला. वक्फ मंडळाच्या मालमत्तांच्या जपवणूकीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीवेळी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयुक्त प्रतिभा इंगळे, अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद, वक्फ मंडळाचे सदस्य इफ्तेकार हाशमी तसेच विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वक्फ मंडळाच्या जागांवर अतिक्रमण आढळल्यास प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर नियमाप्रमाणे कारवाई करा. संबंधित महानगरपालिका किंवा नगरपालिका यांनी याबाबत कार्यवाही करावी. छत्रपती संभाजीनगर, बीड तसेच धाराशिव येथे मोठया प्रमाणात वक्फ मालमत्ता मिळकतीवर घरे बांधली आहेत. पोलीस प्रशासनाकडे वक्फ कायद्यातील तततूदीप्रमाणे प्रकरणे येतात, त्यामध्ये पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे. महसूल विभागाच्या 2016 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा, असे निर्देशही त्यांनी दिले. विभागीय आयुक्त श्री पापळकर म्हणाले, वक्फ मालमत्तेबाबत सबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांनी एकत्रित सर्व्हेक्षण करावे व मालमत्तेचा वापर बेकायदेशीर होत असेल तर नियमानूसार तपासून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. यावेळी विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका अधिकारी यांच्यासह जिल्हा पातळीवरील वक्फ मंडळाचे अधिकारी दुरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.
1. Chairman of Maharashtra State Waqf Board A review of the functioning of the Board by Sameer Kazi

What's Your Reaction?

