विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा वाचा फोडा अन्याय दूर करा, हक्क-अधिकार जाणून घ्या- न्या. रविंद्र घुगे
छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका) महिलांनो आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला निर्भयपणे वाचा फोडा. अन्यायाविरुद्ध वाचा फोड्ल्यावरच अन्याय दूर करता येईल. महिलांनी सक्षम व्हावे आणि आपले हक्क अधिकार जाणून घ्यावे,असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती तथा औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ पालक न्यायमुर्ती रविंद्र घुगे यांनी आज फुलंब्री येथे केले. फुलंब्री येथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विधी सेवा महाशिबिरांतर्गत शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजीत करण्यात आला होता. यामेळाव्याचे उद्घाटन न्या. घुगे यांच्या हस्ते एका रोपट्याला पाणी देऊन करण्यात आले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व पालक न्यायमूर्ती संजय देशमुख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभा इंगळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा नागरे, तहसिलदार डॉ. कृष्णा कानुगले तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. न्या. घुगे म्हणाले की, विविध दिवस आपण साजरे करतो. त्या आधी त्या दिवसांच्या मागील संकल्पना समजून घ्या. महिलांच्या व मुलींच्या संरक्षणासाठी असलेले कायदे जाणून घ्या. महिलांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडा. आपले नाव, माहिती गुपित ठेवली जाते. त्यामुळे बदनामीची भिती बाळगू नका. वाचा फोडल्याशिवाय अन्याय दूर होत नाही. मुलगा किंवा मुलगी जन्माला येणे यास केवळ पुरुष जबाबदार असतो याची वैद्यकीय माहिती देणारे स्टॉल्स लावा. लोकांना माहिती द्या. स्त्रियांनी सक्षम व्हावे. सज्ञान व्हावे. आपले हक्क आणि अधिकार जाणून घ्यावे,असे आवाहन त्यांनी केले. एकमेकांशी चांगले वागणे हाच खरा न्याय- न्या. देशमुख सर्व माणसांनी एकमेकांशी चांगले वागणे हाच खरा न्याय आहे,असे प्रतिपादन न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी केले. ते म्हणाले की, एकमेकांना मान सन्मान देणे, चांगले वागणे यातून अनेक वाद संपुष्टात येतात. एकमेकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणे हे सुद्धा न्यायदानच आहे. शासकीय अधिकाऱ्यांना मिळालेले पद हे ऐटीसाठी नसून लोकांना न्याय देण्यासाठी आहे,असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा प्रशासनाने सामान्य नागरिकांना त्यांचे न्याय व हक्क लाभ देण्यासाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.शासकीय सेवा, योजना यांची अंमलबजावणीचे निरीक्षण करण्यासाठी न्यायमूर्ती आले आहे. जिल्हाप्रशासनाने बालविवाह, कुपोषण निर्मूलन, माता बालमृत्यू, महिला सुरक्षा, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण दिव्यांगांची नोंदणी करण्यासाठी घरोघरी जाऊन मोहिम राबविणे असे विविध उपक्रम राबवून अधिकाधिक घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली. पोलीस अधीक्षक राठोड यांनी महिलांनी सायबर संबंधित गुन्ह्यांबाबत सावध रहावे. फसवणूकीपासून स्वतःचा बचाव करावा. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास १९३० या क्रमांकावर किंवा NCCR पोर्टलवर तक्रार नोंदवून आपण दाद मागू शकता,असे सांगितले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ३५० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच तक्रार पेटी ठेवण्यात आली आहे. शालेय विद्यार्थी आपल्यावरील अन्यायाबाबत त्यात तक्रार नोंदवू शकतात. जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्या तयार करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रम प्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आले. त्यानंतर सर्व न्यायमूर्तींनी शिबिरात लावण्यात आलेले माहिती व सेवेच्या स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली. प्रास्ताविकात प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आपण विधी सेवा प्राधिकरणामध्ये वैयक्तिक वाद, समस्या, मानसिक समस्या याबाबतही मार्गदर्शन घेऊ शकता, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस यांनी आभार मानले. स्वत चे चित्र पाहून न्यायमूर्ती अचंबित या कार्यक्रम प्रसंगी चिंचोली बाबरा येथील इयत्ता ९ वी चा विद्यार्थी असणाऱ्या पियुष समाधान जंगले या विद्यार्थ्याने न्या. रविंद्र घुगे, न्या. संजय देशमुख यांचे चित्र काढून त्यांना भेट दिले. या लहान चित्रकाराने काढलेले स्वत चे हुबेहुब चित्र पाहून न्यायमूर्ती अचंबित झाले. त्यांनी या मुलाचे कौतुक केले व त्यास बक्षीसही दिले. हा विद्यार्थी चिंचोली बाबऱ्याला स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात शिकतो.

1. Legal Services Mahashibir A grand gathering of government services and schemes Read, eliminate injustice, know your rights- Justice Ravindra Ghuge
What's Your Reaction?






