८६ व्या जयभीम दिन व मक्रणपुर परिषदेत सुकुमार कांबळे यांचे प्रतिपादन
गौतम बुद्धांचा धम्म म्हणजे माणसाच्या सुखाचा शोध ८६ व्या जयभीम दिन व मक्रणपुर परिषदेत सुकुमार कांबळे यांचे प्रतिपादन जयभीम दिन स्मरणीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन कन्नड/प्रतिनीधी मुजीब खान : गौतम बुद्धांनी सर्वात प्रथम जातीव्यवस्था मोडीत काढली. पाण्यासाठी माणसाने माणसाची डोकी फोडावी, हे मान्य नसल्याने त्यांनी राजगादीचा त्याग केला आणि सुखाच्या शोधात निघाले. त्यातून त्यांना धम्माचा शोध लागला. गौतम बुद्धांचा धम्म म्हणजे माणसाच्या सुखाचा शोध होय, असे प्रतिपादन सांगली येथील जेष्ठ आंबेडकरी विचारवंत सुकुमार कांबळे यांनी केले. स्वातंत्र्यसेनानी दलितमित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठान, जयभीम मित्र मंडळ आणि महिला मंडळाच्या वतीने, कन्नड शहराजवळील मक्रणपुर येथे आयोजित ८६ व्या,' जयभीम दिन व मक्रणपुर परिषदेचा अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. या वेळी पोलिस अधिक्षक ( ग्रामीण) डॉ. विनय राठोड, जेष्ठ पत्रकार स. सो खंडाळकर,भन्ते ग्यानरक्षित महाथेरो, जेष्ठ समाजसेविका चंद्रसेनाताई शेजवळ, तहसिलदार विद्याचरण कडवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे,शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप, सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सुर्यवंशी, वरिष्ठ पत्रकार मुख्तार खासाब, जिल्हा मुद्रांक नोंदणी अधिकारी जी.बी. सातदिवे यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना सुकुमार कांबळे म्हणाले की, आजच्या तरुणांना आंबेडकरी विचारांचे महत्व वाटत नाही. मात्र जयभीम आपला श्वास आहे आणि तो सर्वांनी जपला पाहिजे. कारण सांस्कृतिक दहशतवाद अजून संपलेला नाही. जात हे विष आहे आणि आपण आजही जातीत अडकलो आहोत. जातीभेद संपल्याशिवाय समता प्रस्थापित होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या परिषदेचे प्रास्ताविक करतांना संयोजक प्रविण मोरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. या वेळी स. खंडाळकर, सत्कारमुर्ती चंद्रसेनाताई शेजवळ, पोलिस अधिक्षक डॉ. विनय राठोड यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाची सुरुवात भिक्खू संघ, बौद्धाचार्य आणि मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या नंतर बौद्धवंदना घेण्यात येऊन मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनाधिकारी मनोज कांबळे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कीर्तीताई मोरे, निलिमाताई उबाळे, अभय उबाळे, गोपीचंद थोरात, राहुल बोदाडे, कारभारी त्रिभुवन, अथर्व मोरे, स्वप्निल बोराडे यांच्यासह स्वातंत्र्यसेनानी दलितमित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठान, जयभीम मित्र मंडळ आणि महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. विदर्भातील ख्यातनाम कवी अजीम नवाज राही यांनी आपल्या खास शायराना शैलीत, बहारदार सूत्रसंचालन केले. राही यांच्या सूत्रसंचालनाने उपस्थित तृप्त होऊन गेले. शेवटी खुलताबाद येथील वनाधिकारी मनोज कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रसिध्द प्रबोधक राहुल अन्विकर व पंचशीला भालेराव यांच्या, भिमगितांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाने या परिषदेची सांगता करण्यात आली.
1.
What's Your Reaction?






