कन्नड वासियांना मिळणार नक्शा मोहिमेतून डिजिटल पी.आर. कार्ड
कन्नड वासियांना मिळणार नक्शा मोहिमेतून डिजिटल पी.आर. कार्ड जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची पत्रकार परिषदेत माहिती मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी) : नक्शा मोहिमेतून शहराचे नागरी भूमापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असुन, या मोहिमेअंतर्गत अत्याधुनिक ड्रोण कॅमेऱ्याच्या सहाय्याने कन्नड नगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. या संदर्भात कन्नड नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रकरणी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, या आधी कन्नड शहरातील मालमत्तांचे ड्रोणद्वारे सर्वेक्षण करून सुमारे १ लाख ६६ हजार मालमत्ता धारकांना पी.आर. कार्ड देण्यात आले आहेत. कन्नड नगरपालिका हद्दीतील केवळ ११ हजार १९० मालमत्तांची नोंद पालिकेत आहे इतर मालमत्तांची पुरेपूर नोंद घेणयासाठी, नक्शा मोहिमेअंतर्गत ड्रोण कॅमेऱ्याच्या सहाय्याने नव्याने सर्वेक्षण करण्यात येईल. ज्या मालमत्तांची नोंद पालिकेत केलेली नसेल, अशा मालमत्ता धारकांना सरसकट ६ वर्षांचा टॅक्स ( कर) आकारण्यात येईल. सर्वेक्षण केलेल्या सर्व मालमत्ता धारकांना अत्याधुनिक पी.आर. कार्ड देण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी कुणाची लुडबुड चालणार नाही. कारण हा सर्व्हे करणारी एजंसी ही दुसऱ्या राज्यातील असेल. या वेळी आमदार संजनाताई जाधव, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक वीर, उपविभागीय अधिकारी तथा पालिका प्रशासक संतोष गोरड, तहसिलदार विद्याचरण कडवकर, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, तलाठी दिपक एरंडे यांची उपस्थिती होती.

1. कन्नड वासियांना मिळणार नक्शा मोहिमेतून डिजिटल पी.आर. कार्ड जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची पत्रकार परिषदेत माहिती
What's Your Reaction?






