मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशातील शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना; अर्ज मागविले
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशातील शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना; अर्ज मागविले छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विशेष अध्ययन करण्यासाठी विदेशात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता पात्र विद्यार्थ्यांकडून विदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज ऑनलाईन सादर करण्याची सुविधा असून त्याची प्रत पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड पुणे ४११००१ येथे सादर करावा,असे प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण जयश्री सोनकवडे यांनी कळविले आहे. योजनेचा उद्देश:- अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला – मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी) विशेष अध्यन करण्यासाठी आर्थिक मदत देणे. योजनेची व्याप्ती:- महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी साठी अद्ययावत QS World University Ranking २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल. परदेशातील विद्यापीठ / शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा. तसेच विद्यार्थ्यांकडे जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उत्पन्न मर्यादा:- या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वत:चे उत्पन्न धरुन सर्व मार्गांनी मिळणारे कुटुंबातील सर्व सदस्यांचे मागील आर्थिक वर्षातील वार्षिक उत्पन्न आठ लक्ष रुपयांपेक्षा अधिक नसावे. शैक्षणिक अर्हता:- परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्यूत्तर पदविका अभयासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५% गुणांसहीत पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख:- https://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रिंट, ऑफलाईन नमून्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयास सादर करावी. अर्ज दि. ३० एप्रिल सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत स्विकारला जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावा,असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण जयश्री सोनकवडे यांनी केले आहे.

1.
What's Your Reaction?






