वक्फ मालमत्तेचा अभूतपूर्व घोटाळा : रिटायर्ड ACP नी केला भांडाफोड -तुर्त जिल्हा वक्फ अधिकार्याची चंद्रपूरला उचलबांगडी
वक्फ मालमत्तेचा अभूतपूर्व घोटाळा : रिटायर्ड ACP नी केला भांडाफोड -तुर्त जिल्हा वक्फ अधिकार्याची चंद्रपूरला उचलबांगडी औरंगाबाद: दर्गाह कवडे शहा साहब, घास मंडी, सिटी चौक येथील वक्फ मालमत्तेच्या संशयास्पद लिलावावर तक्रार करत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. माजी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. रियाज़ुद्दीन देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून लिलावातील कथित गैरव्यवहार उघड करण्याची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, सी.टी.एस. क्रमांक 6492 मधील 3000 चौरस फुटांची मोकळी जागा तीन वेगवेगळ्या भागांमध्ये विभागून ११ महिन्यांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आली. तथापि, हा लिलाव अत्यल्प दराने आणि संशयास्पद प्रक्रियेत पार पडल्याचा आरोप आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, लिलावाची जाहीर नोटीस शहरातील प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये न देता दोन अल्प परिचित वृत्तपत्रांमध्ये (मराठी ‘विश्वामित्र’ आणि उर्दू ‘औरंगाबाद एक्सप्रेस’) प्रसिद्ध करण्यात आली. विशेष म्हणजे, या दोन्ही वृत्तपत्रांचे मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक एकाच व्यक्तीचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या वृत्तपत्रांचा प्रसार अत्यंत कमी असल्याने लिलावाची माहिती फारच कमी लोकांपर्यंत पोहोचली. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, लिलाव नोटिशीमध्ये प्रत्येकी 1000-1000 चौरस फुटांचे तीन प्लॉट्स देण्यात येणार होते, पण प्रत्यक्षात लिलाव 1400, 800 आणि 800 चौरस फुटांच्या भूखंडांसाठी झाला. एवढेच नव्हे, तर 800-800 चौरस फुटांसाठी बोली जिंकलेल्या लोकांना प्रत्येकी 850 चौरस फुटांचा प्लॉट देण्यात आला. शहराच्या ‘क्रीम लोकेशन’ वर असलेल्या या प्लॉट्ससाठी बाजारभावानुसार भाडेपट्टा किमान ८० हजार ते १ लाख रुपये महिना लागू शकला असता, परंतु प्रत्यक्षात ही मोकळी जागा महिना १२,३००/- , ७,२००/- आणि ७,०००/- या अत्यल्प दराने दिली गेली. त्यामुळे महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, लिलावात भाग घेणाऱ्या अनेक अर्जांमध्ये खोडतोड करण्यात आली आहे, आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे दिसून येते. तक्रारदारांच्या मते, ही संपूर्ण जमीन प्रत्यक्षात एकाच इसमाने घेतली असावी आणि नावापुरते इतरांना समाविष्ट करण्यात आले असावे. तक्रारदारांनी लिलाव जिंकलेल्या जागेवर महाराष्ट्र वक्फ मंडळाची तसेच महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधकाम सुरू असल्याची माहिती दिली आहे. भाडेपट्टा करारनाम्यातील अटींनुसार अशा प्रकारचे बांधकाम पूर्णपणे नियमबाह्य आहे, त्यामुळे हे करारनामे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. • सूत्रांच्या माहितीनुसार, लिलाव जिंकलेल्या व्यक्तींना येत्या काही दिवसांत ३० वर्षांसाठी भाडेपट्टा देण्याच्या हालचाली सुरू असून त्यासाठी अर्जही गोळा केले जात आहेत. जर हा प्रकार पुढे गेला, तर वक्फ मंडळाच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तक्रारदार डॉ. रियाज़ुद्दीन देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे पुढील मागण्या केल्या आहेत: लिलावाच्या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी. लिलावात सहभागी झालेल्या सर्व अर्जदारांचे हस्ताक्षर आणि स्वाक्षरींचे नमुने तपासण्यात यावेत. संशयित पद्धतीने दिले गेलेले भाडेपट्टा करार त्वरित रद्द करण्यात यावेत. अनधिकृत बांधकाम तात्काळ निष्कासित करण्यात यावे. लिलाव प्रक्रियेत सहभागी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात यावेत. प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात यावी. चौकशी दरम्यान जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. या तक्रारीची प्रत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या चेअरमन, अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री, मुख्य सचिव, तसेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आली आहे. कोट्यावधी रुपयांचे वक्फ मालमत्तेचा अभूतपूर्व घोटाळ्याचा रिटायर्ड ACP डॉ. रियाज़ुद्दीन देशमुख यांनी वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करीत भांडाफोड केल्याने त्याच दिवशी तूर्त औरंगाबाद जिल्हा वक्फ अधिकारी अतीक़ यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यांना चंद्रपूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. या गंभीर स्वरूपाच्या घोटाळ्याची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईल का? त्याला नोकरीतून बडतर्फ केल्या जाईल का? की प्रकरण दाबले जाईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलेली आहे.

1.
What's Your Reaction?






