मानवी हक्कांची जोपासना हे प्रत्येकाचे कर्तव्य- ॲड.अभय टाकसाळ
मानवी हक्कांची जोपासना हे प्रत्येकाचे कर्तव्य- ॲड.अभय टाकसाळ छत्रपती संभाजीनगर,दि.१०- माणसाने माणसाशी माणसासम वागणे, या एका गीतातील ओळींप्रमाणे प्रत्येक माणसाचे अन्य माणसांच्या हक्कांची जोपासना करणे हे कर्तव्य असून, त्या बद्दलची जाणीव वृद्धिंगत करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन ॲड. अभय टाकसाळ यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज मानवी हक्क दिनानिमित्त ॲड.टाकसाळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे होते. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, मनपाचे अति. आयुक्त रणजीत पाटील, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा न्यायालयाचे ॲड. मधुकर आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ हे उपस्थित होते. ॲड. टाकसाळ म्हणाले की, संयुक्त राष्ट्रसंघाने १० डिसेंबर १९४८ रोजी मानवी हक्काचे घोषणापत्र जाहीर केले. त्यात प्रत्येक मानवाचे मुलभूत अधिकार हे देश, भाषा, लिंग. धर्म जात इ. कोणताही भेद न बाळगता सर्वदूर आणि सर्वकाळ अबाधित राखण्याची तरतूद करुन देण्यात आले. या अधिकारांची जोपासना प्रत्येकाचे कर्तव्य आहेत. भारतीय संविधानाच्या प्रत्येक कलमात मानवी हक्कांची जोपासना होतांना दिसते. मुळात मानवी हक्क म्हणजे परस्परांचे स्वातंत्र्य मान्य करणे हे होय. अध्यक्षीय समारोपात जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, संविधानात दिलेल्या मुलभूत हक्क आणि अधिकार यांच्या पालनातून आपण मानवी हक्कांची जोपासना करीत असतो. मानवी हक्कांची जोपासना करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य असले तरी त्याचे पालन आपण करतोय की नाही? याची सुरुवात आपण आपल्या घरापासून करावी. प्रत्येक धर्मात मानवी हक्कांची जोपासना करण्याचे अध्यात्मिक तत्वज्ञानातून सांगितले आहे. प्रत्येक माणसाची मानवी हक्कांची जपणूक करणे हे आद्यकर्तव्य आहे,असेही श्री. स्वामी यांनी सांगितले. प्रास्ताविक मुबारक पठाण यांनी केले तर आभार पुनम तरार यांनी मानले. सुत्रसंचालन रोहिणी माळी यांनी केले.

1.
What's Your Reaction?






