भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांच्या विचारांचा वारसा जपणं गरजेचे ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना
भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांच्या विचारांचा वारसा जपणं गरजेचे ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना छत्रपती संभाजीनगर: भारतरत्न कर्पूरी ठाकूर केवळ नाभिक समाजाचे नेते नव्हते, तर सर्व ओबीसी समाजाचे होते. त्यांनी गरिबी, जातीयता, आणि भेदभावाविरोधात संघर्ष केला. त्यांच्या धोरणांचा फायदा दलित, आदिवासी, आणि इतर मागासवर्गीय समाजालाही झाला.भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांच्या विचारांचा वारसा जपणं गरजेचे असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्र ओबीसी जनजागरण व संघर्ष समिती, नॉन पॉलिटिकल ओबीसी-एससी-एसटी सोशल फोरम, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनाजेशन, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मायक्रो ओबीसी समिती, सकल नाभिक समाज, बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंचच्या वतीने भारतरत्न कर्पूरी ठाकूर जन्म शताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी (दि. २४) संत सेना भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी महापौर भगवान ( बापू) घडमोडे होते. व्यासपीठावर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार, कोषाध्यक्ष रामदास पवार, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा मुख्य संघटक महेश निनाळे, मनपाचे माजी स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, जेष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर, शंकरराव आडसुळ, संयोजक विष्णू वखरे, संत सेना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज जाधव, दिलीप अनर्थे, मिर्झा कय्युम नदवी, किरण भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. स.सो. खंडाळकर म्हणाले, सामाजिक न्याय, समानता आणि प्रगतीचा संदेश देणाऱ्या कर्पूरी ठाकूर यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प ओबीसींनी करायला हवा. त्यांच्या जीवनातील संघर्ष, समाजासाठी त्यांनी केलेले काम आणि त्यांच्या धोरणांचे महत्त्व पुस्तक स्वरूपात लोकांपर्यंत जायला हवे. त्यांच्या प्रतिमांचे कॅलेंडर तयार करून प्रत्येक घरात त्यांची ओळख निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. महेश निनाळे म्हणाले, कर्पूरी ठाकूर यांचे जीवन हे संघर्ष, साधेपणा आणि जनतेसाठीची निस्वार्थ सेवा याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी सुरू केलेली सामाजिक क्रांती ही त्यांच्या निधनानंतरही प्रेरणा देत राहते. त्यांची शिकवण आणि काम पुढे नेणं हेच त्यांच्या आदरांजलीचे खरं स्वरूप आहे. *आल इंडिया मुस्लिम औबीसी आर्गेनाइजेशन चे राष्ट्रीय प्रवक्ता मिर्झा कय्युम नदवी म्हणाले, कर्पूरी ठाकूर हे केवळ बिहारपुरते सीमित नाहीत, ते संपूर्ण देशातील मागासवर्गीयांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांचा प्रसार समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो. त्यांच्या जीवनकार्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात व्हावे, तसेच जर कोणी कर्पुरी ठाकुर वर मुलांसाठी पुस्तक लिहणार असेल तर लीड ॲंड लीड फाउंडेशन औरंगाबाद द्वारा ते प्रकाशित करण्यात येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.* किरण भांगे म्हणाले, कर्पूरी ठाकूर यांनी स्वतःच्या साध्या जीवनातून सामाजिक न्यायासाठी मोठा लढा दिला. त्यांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत, यासाठी सर्वांनी योगदान द्यायला हवे. सयाजी झुंजार म्हणाले, ओबीसी समाजातील प्रत्येक व्यक्तीने कर्पूरी ठाकूर यांच्या विचारधारांचा अभ्यास करावा व त्यांना आत्मसात करावे. त्यांच्या आयुष्याची प्रेरणा घेऊन समाजहिताचे कार्य करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या नेतृत्वाचा आदर्श घेत, ओबीसी समाजाने आपल्यातील मतभेद दूर करून एकजूट साधावी. जर ओबीसी समाज संघटित झाला तर त्यांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करता येईल. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राजकीय दबाव निर्माण करता येईल. शिवाय, या चळवळीद्वारे समाजाला अधिकाधिक प्रगतीच्या दिशेने नेणे शक्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. माजी महापौर भगवान घडमोडे म्हणाले, ओबीसी समाज हा भारतातील एक मोठा घटक असून, त्यांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय अधिकारांसाठी एकत्र येणे आज काळाची गरज बनली आहे. देशभरात विविध जाती, पंथ व घटक त्यांच्या हक्कांसाठी एकत्र येत आहेत, तशीच एकजूट ओबीसी समाजामध्येही निर्माण होणे आवश्यक आहे. आजच्या काळात, जिथे जाती-आधारित असमानता अजूनही टिकून आहे, तिथे कर्पूरी ठाकूर यांचे विचार आणि संघर्ष आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. ज्या नेत्यांनी ओबीसींसाठी संघर्ष सुरू ठेवला आहे, त्यांना पाठिंबा देणं ही काळाची गरज असल्याचे घडमोडे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू वखरे तर आभार कचरू जाधव यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुरेश आगलावे, दादासाहेब काळे, नितीन क्षीरसागर, उमाकांत वैद्य, दिलीप दळवी, अण्णासाहेब बर्वे, गणेश वैद्य, सोपान शेजवळ, कचरू जाधव, पद्माकर अंबोदकर, सुरेश बोर्डे, ज्ञानेश्वर तारे, बाबासाहेब अपार, बाबासाहेब शेळके, निलेश दळवी, निलेश बोर्डे, संजय पंडित, योगेश गायकवाड, विजय मोरे, वसंत लिंगायत, दिलीप राऊत, प्रकाश बेलकर, गालूप्रकाश श्रीवास्तव, अब्दुल सत्तार, संतोष सुरवसे, अभिजित शिंदे, योगेश गायकवाड, संतोष जाधव, विक्रम पवार यांनी पुढाकार घेतला. ---- कर्पूरी ठाकूर यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी हे करण्याचा निर्धार १) संशोधन केंद्र स्थापन करणे: कर्पूरी ठाकूर यांच्यावर संशोधन करणाऱ्या केंद्राची स्थापना करणे, जेथे त्यांच्या जीवनकार्याचा सखोल अभ्यास होईल. २) शैक्षणिक उपक्रम: शाळा-कॉलेजांमध्ये कर्पूरी ठाकूर यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम आयोजित करणे. ३) प्रेरणादायी साहित्य: पुस्तके, माहितीपत्रके, कॅलेंडर आणि पोस्टर्सद्वारे त्यांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवणे. ४) स्मारक उभारणे: त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून स्मारक उभारून त्यांच्या विचारांचे संवर्धन करणे.
What's Your Reaction?






