डेअरीत दूध टाकून परतणाऱ्या मुलांना अज्ञात वाहनाने उडविले,दोघांचा मृत्यु, म्हैसमाळरोडवर घडला भीषण अपघात

खुलताबाद (५ जानेवारी) - दुचाकीला अज्ञात वाहनाने उडवल्याने दोन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना खुलताबाद- म्हैसमाळ रोडवर शनिवारी (४ जानेवारी) रात्री आठच्या सुमारास घडली. मंगेश गणेश काळे (वय १६) व समाधान संतोष नागे (वय १४, दोघेही रा. लालमाती, ता. खुलताबाद) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे असून, दोघे खुलताबाद शहरातील दूध डेअरीत दूध टाकून दुचाकीने घरी परतत होते.
मंगेश व समाधान दुचाकीने खुलताबाद शहरातील बजरंग चौक परिसरातील दूध डेअरीवर दूध टाकण्यासाठी आले होते. दूध दिल्यानंतर दोघेही गावाकडे म्हैसमाळ रोडने परतत होते. त्यांच्या दुचाकीला (क्र. एमएच २० एफएम ७३८९) अज्ञात वाहनाने लालमातीजवळील अलीकडच्या वळणावर जोरात धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. मंगेश व समाधान दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांना खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. मंगेश दहावीत, तर समाधान आठवीत शिकत होता. समाधान आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. दोघांच्याही मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, पोलीस अंमलदार सिद्धार्थ सदावर्ते यांनी भेट देऊन पंचनामा केला. मुलांना उडवून पसार झालेल्या वाहनाचा खुलताबाद पोलीस शोध घेत आहेत.
What's Your Reaction?






