१२ हजार दुध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा
१२ हजार दुध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा छत्रपती संभाजीनगर, दि.२१ जानेवरी– राज्यातील सहकारी व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर दुधासाठी ५ रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. त्यांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार १६७ दुध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी ८ लक्ष रुपयांचे अनुदान जमा झाले आहे,असे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ यांनी कळविले आहे. सहकारी संघ व खासगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर ५ रुपये अनुदान देणे निश्चित केले आहे. या योजनेची जिल्हास्तरीय पडताळणी संबधित जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या त्रिस्तरीय समिती मार्फत करण्यात येते. या योजनेच्या प्रथम टप्प्यात या कार्यालयाने अनुदान योजनेत सुरुवातीला जिल्ह्यातील सहभागी १२ प्रकल्पांमार्फत एकूण लाभार्थी दुध उत्पादक ४ हजार ३८१ शेतकऱ्यांच्या एकूण ९ लक्ष ४३ हजार लिटर अनुदान पात्र दुधास रु.४ कोटी ५२ लक्ष इतके अनुदान प्रत्यक्षात दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे वर्ग करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात सहभागी २९ प्रकल्पामार्फत एकूण सहभागी पात्र १४१७८ लाभार्थी दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदान प्राप्त ३ कोटी ६१ लक्ष लि. दुधापैकी आत्तापर्यंत एकूण ७७८६ दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या एकूण २ कोटी १४ लक्ष लिटर पात्र दुधास १० कोटी ५६ लक्ष रुपये अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. तर उर्वरित ६३९२ दुध उत्पादक शेतकऱ्यांचे १ कोटी ४६ लक्ष लिटर दुधाचे अनुदान वर्ग करण्याची कार्यवाही सुरु आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करुन घेण्याविषयी सर्व दुग्ध प्रकल्प व शितकरण केंद्रांना आवाहन करण्यात आले आहे. अनुदान पात्र सहकारी, खासगी दुध प्रकल्पांनी अनुदान योजनेत देयके तपासुन पोर्टलवर सादर करण्यासाठी नियुक्त केलेले मेकर व चेकर यांना शासनाच्या अनुदान पोर्टलवर प्रकल्पाशी निगडीत पात्र दुध उत्पादकांची व त्यांच्या दुधाळ जनावरांची तसेच त्यांच्या दुध खरेदीची रक्कम प्रकल्पांनी त्यांना बँक खात्यावर अदा केल्याचे बँक स्टेटमेंट विषयांची संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने संगणक प्रणालित भरण्याकरीता जिल्हा दुग्धव्यवसाय कार्यालयातील विस्तार अधिकारी एस.एन. आदमाने , दुध संकलन पर्यवेक्षक व्ही.बी.पाटील, वरिष्ठ सहायक के.टी.गायकवाड, लिपिक-नि-टंकलेखक के.आर. गांधले विशेष सहकार्य करुन अनुदान पोर्टलवर प्राप्त देयके तपासणीसाठी पदुम विभागाचे लेखापरीक्षणकांनी सहकार्य करुन पात्र लाभार्थी दुध उत्पादक शेतकऱ्यापर्यंत शासन अनुदानाचा लाभ पोहचविण्याचा सांघिक प्रयत्न केला आहे,असे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ मोरे यांनी कळविले आहे.
1.
What's Your Reaction?






