राज्याला अर्थिक संपन्न करणारा अर्थसंकल्प-हेमंत पाटील
राज्याला अर्थिक संपन्न करणारा अर्थसंकल्प-हेमंत पाटील परदेशी गुंतवणुकीमुळे विकास साधणार पुणे, दिनांक ११ मार्च २०२५ गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र योग्य असून राज्यात यंदा मोठ्याप्रमाणात देशी-परदेशी गुंतवणूक झाली आहे.औद्योगिक विकासात राज्याने झेप घेतली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच 'दावोस'येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्याने एकूण ६३ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करीत मोठ्याप्रमाणात विदेशी गुंतवणूक आकर्षित केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्प हा राज्यात आर्थिक संपन्नता घेवून येईल,अश्या शब्दात इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली. राज्यात येत्या काळात १५ लाख ७२ हजार कोटींहून अधिकची गुंतवणूक होणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. या गुंतवणुकीमुळे मोठ्याप्रमाणत रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.राज्याने जाहिर केलेल्या लॉजिस्टिक धोरणामुळे १० हजार एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. ५ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार त्यामुळे निर्माण होतील, ही देखील बाब राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची असल्याचे पाटील म्हणाले. अर्थसंकल्पातून सरकारने शेतकऱ्यांवर योजनांचा पाऊस पाडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी बाजार समित्या अस्तित्वात नसलेल्या तालुक्यांमध्ये 'एक तालुका-एक बाजार समिती' योजना सरकार राबवणार असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होईल असे पाटील म्हणाले. समृद्धी महामार्गालगत अॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित करण्याची घोषणा सरकारने केली आहे. शीतगृह, ग्रेडिंग तसेच पॅकिंग, निर्यात हाताळणी केंद्र या ठिकाणी पुरविले जातील. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याने अन्नदात्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.सर्वसामान्यांना हक्काचे घर उपलब्ध करवून देण्यासाठी राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत राज्याकडून देण्यात येणाऱ्या अनुदानात ५० हजारांची वाढ करण्यात आल्याचे सर्वसामान्यांना दिलासा मिळाल्याचे पाटील म्हणाले.

1.
What's Your Reaction?






