देशातील गतिमान आरोग्य सेवेची जागतिक स्तरावर दखल_केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा
देशातील गतिमान आरोग्य सेवेची जागतिक स्तरावर दखल_केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा छत्रपति संभाजीनगर दि २७ (प्रतिनिधि ) केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत असून चालू वर्षात कर्करोगावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यामुळे लवकर निदान करण्यासोबतच निदान झाल्यावर 90 टक्के रुग्णांवर 30 दिवसात उपचार सुरू करण्यात आले आहे. याची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. 2019 मध्ये ज्या जागेवर मी भूमीपुजन केले त्याच जागेवर आज भव्य आणि अद्ययावत रुग्णालय उभे राहिले व माझ्या हस्ते उद्घाटन झाले याचा विशेष आनंद असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणाले, आरोग्य सुविधेबाबत केंद्र शासन सर्वंकष धोरण राबवित असून यामध्ये लवकर निदान, उपचार यासोबतच प्रतिबंध या तीन सुत्रांवर काम सुरू आहे. कर्करोग ही प्राधान्याची बाब ठरवून चालू वर्षात 200 डे केअर सेंटर्स उभारली जाणार आहेत. तसेच आरोग्य सुविधेचा घटक असणाऱ्या नर्सिंगबाबतही धोरण ठरविले असून देशात नवीन 100 नर्सिंग महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत अशी माहितीही श्री.नड्डा यांनी दिली. टु बीम व्यवस्थेमुळे अधिक चांगल्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. कर्करोग झालेल्या रुग्णाचे संपूर्ण घर त्याच्या धसक्याने खचून जाते. अशा सर्वाना यातून खंबीर आधार देता येणार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जात आहेत. 780 वैद्यकीय महाविद्यालये आज देशात आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. उपचारासाठी यंत्रणा उभारताना प्रतिबंधावर शासनाचा अधिक भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात 1 लाख 75 हजार आयुष्यमान आरोग्य मंदिर स्थापन केले आहेत. या सुविधेतून कर्करोगाचे निदान करण्यासाठी स्क्रिनिंग करण्यात येते. स्क्रिनिंगची क्षमता वाढविण्यात आली असून कर्करोगाचे वेळेत निदान होणे शक्य झाले आहे. यातून तोंडाचा कर्करोग, महिलांचा स्तनाचा कर्करोग याचे वेळेत निदान झाल्याने वेळेत उपचाराही सुरू झाले आहेत. देशातील आरोग्य व्यवस्थेत अनेक बदल करण्यात येत आहेत. येत्या काळात देशातील आरोग्य व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी भरीव निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा, वैद्यकीय शिक्षण यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही असे त्यांनी सांगितले. 15 व्या वित्त आयोगात 7 हजार कोटी रुपयांची तरतूद आरोग्यासाठी करण्यात आल्याचे सांगून श्री.नड्डा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून देशातील 60 कोटी ज्येष्ठ नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देशातील विमा योजनेला राज्याने जोड दिली असून आतापर्यंत 10 नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत आहेत. त्यात आणखी एकाची भर घालण्यात येत असून अतिरिक्त 700 वैद्यकीय जागा महाविद्यालयात देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली

1.
What's Your Reaction?






